चिंताजनक! म्हाडाच्या ‘या’ घरांची विक्री थांबणार? मुंबईतील या प्रकल्पांचे काम बंद पडण्याची शक्यता; पहा प्रकल्पांची यादी..!

मुंबई : अलीकडेच महारेराकडून राज्यातील तब्बल 1 हजार 750 व्यापगत (लॅप्स) प्रकल्पांची नोंदणी निलंबित करण्यात आली असून अजून 1 हजार 137 एवढ्या प्रकल्पांची नोंदणी निलंबित करण्याचे काम सुरू आहे. मुंबईत सामान्यांना घरे उपलब्ध करून देणार्‍या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या तीन प्रकल्पांचा देखील यात समावेश असल्याचं उघडकीस आलं आहे. सध्या म्हाडाच्या या तिन्ही प्रकल्पांची कामे सुरू आहे आणि या प्रकल्पांत असलेल्या घरांची विक्री सोडत (Mhada Lottery) काढून करण्यात येणार आहे. पण आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता म्हाडाच्या या घरांचे बांधकाम बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून यामुळे आता म्हाडाची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पांची पुनर्नोंदणी करण्याचा प्रयत्न म्हाडाकडून करण्यात येणार आहेत.

रेराच्या कायद्यानुसार महारेरा नोंदणीकृत असलेल्या प्रकल्पांना (Maharera Registerd Project) प्रतेक तीन महिन्याच्या कालावधीनंतर प्रकल्पाची माहिती देणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. नोंदणी करताना नमूद करण्यात आलेल्या मुदतीच्या काळात प्रकल्पाचे काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीमध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही तर महारेराकडून मुदत वाढवून घेणे आवश्यक असते.

जर या तरतुदींचे पालन केले नाही तर प्रकल्पांना व्यापगत यादीत समाविष्ट करून प्रकल्पाचे काम बंद करण्यात येते. त्यासोबतच घराची विक्री देखील थांबविली जाते. अशा व्यापगत यादीमधील तब्बल 1 हजार 750 एवढ्या प्रकल्पांची नोंदणी नुकतीच महारेराकडून निलंबित करण्यात आली आहे. या यादीत म्हाडाच्या तीन प्रकल्पांचा समावेश आहे.

निलंबन यादीत म्हाडाचे हे तीन प्रकल्प

महारेराकडून निलंबित करण्यात आलेल्या प्रकल्पांच्या यादीत म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या (Mhada Mumbai) तीन प्रकल्पांचा समावेश आहे. यात गोरेगाव आणि सिद्धार्थनगर येथे असलेल्या अल्प गटामधील घरांचा प्रकल्प तसेच विक्रोळीमधील अल्प आणि मध्यम गटामधील प्रकल्प त्यासोबतच कोपरी पवई येथे असलेल्या एका प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे. या यादीत म्हाडाच्या तीन प्रकल्पांची नावे आल्यानंतर आता म्हाडा जागे झाली आहे. प्राधिकरणातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संबंधित विभागीय कार्यकारी अभियंत्यांकडून या तिन्ही प्रकल्पांची माहिती मागविण्यात आली आहे.

Leave a Comment